बारामती | निंबुतमध्ये केबल चोरीचे सत्र सुरूच; शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबल लंपास!

 



पुरंदर रिपोर्टर Live 

सोमेश्वरनगर-रमेश कदम

                   बारामती तालुक्यातील निंबुत परिसरात मोटारींच्या केबल चोरीचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी पुन्हा शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी निंबुत परिसरातील सुमारे चार शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबल चोरीला गेल्या होत्या. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसतानाच पुन्हा केबल चोरीची घटना घडली. यामध्ये बाळासो धोंडीबा लकडे यांच्या गट क्रमांक २४२ मधील विहिरीवरील तसेच भारती शिवाजी काकडे यांच्या गट क्रमांक २४१ मधील विहिरीवरील एकूण ४ हजार ८०० रुपये किमतीची इलेक्ट्रिक केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

याप्रकरणी बाळासो धोंडीबा लकडे (वय ७१) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडे वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडत आहे. चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निंबुत परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

केबल चोरांना आळा कधी बसणार? असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

Post a Comment

0 Comments